मंत्रालयातील बड्या सरकारी अधिकाऱ्यांचे ‘वाईफ स्वॅपींग’ !! भोंदू खरात प्रकरणी विजय वडेट्टीवारांच्या स्फोटक दाव्याने खळबळ

Foto
नागपूर : नाशिकमधील विकृत भोंदूबाबा अशोक खरात याचे मंत्रालयातील अधिकाऱ्यांसोबत लागेबांधे होते. तो या बड्या अधिकाऱ्यांना एकमेकांच्या फॅमिली शेअर करायला सांगायचा, असा स्फोटक दावा काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी केला. राज्य सरकार या अधिकाऱ्यांवर कारवाई करत नाही कारण त्यांना भीती वाटते, असेही वडेट्टीवार यांनी म्हटले. ते सोमवारी नागपूरमध्ये बोलत होते. 

अशोक खरात याच्या मोबाईलमध्ये सांकेतिक भाषेत कोडवर्डमध्ये काही नेत्यांची नावे लिहली आहेत. कारण खरात अनेकांचे काळे पैसे पांढरे करायचे काम करत होते. मात्र, त्याने काही फरक पडत नाही. जे या कृत्यात सहभागी आहे त्या सर्वांची चौकशी करायला पाहिजे. फक्त रुपाली चाकणकर यांना समन्स  देऊन  चालणार नाही, तर ज्या ज्या 49 आमदारांचे फोटो अशोक खरात सोबत आहे, त्या सगळ्यांची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी विजय वडेट्टीवार यांनी केली.

अनेक सरकारी अधिकारी आपल्या पत्नीला आणि कुटुंबीयांना घेऊन अशोक खरात याच्याकडे जात होते. जे पती आपल्या पत्नीला खरात कडे पाठवत होते, ते पती पण तितकेच दोषी आहे. त्यांची पण चौकशी करून अंधश्रद्धा निर्मूलन कायद्या अंतर्गत गुन्हे दाखल व्हायला पाहिजेत, असे वडेट्टीवार यांनी म्हटले.

अधिकाऱ्यांच्या बायका खरातच्या केबिनमध्ये जायच्या, नवरे बाहेर बसून राहायचे: विजय वडेट्टीवार
अनेकांच्या मोठमोठ्या लोकांच्या बायका अशोक खरात याच्या ऑफिसमध्ये जात होत्या. त्यांचे नवरे बाहेर बसून राहायचे. हे अधिकारी भोंदूगिरीला, अंधश्रद्धेला समर्थन द्यायचे. बाकी आतमध्ये काय झाले, याबद्दल मी बोलणार नाही, त्याचे पुरावे माझ्याकडे नाहीत. सध्या समोर येणारे व्हिडीओ सिलेक्टेड आहेत. अशोक खरातच्या ऑफिसमध्ये सापडलेल्या पेनड्राईव्हमध्ये 1000 व्हिडीओ आहेत, पण त्यापैकी फक्त 150 व्हिडीओ समोर आले आहेत. ज्या महिलांवर लैंगिक अत्याचार झाला त्यांच्या नवऱ्यावर कारवाई केली पाहिजे. 

अशोक खरात हा अनेक वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्यांना एकमेकांच्या बायका शेअर करायला सांगायचा. हे किती घाणेरडं आणि महाराष्ट्राची इभ्रत काढणारं प्रकरण आहे. तरीही राज्यकर्त्यांना थोडीही लाज वाटत नाही, अशी टीका विजय वडेट्टीवार यांनी केली.

रुपाली चाकणकरांना समन्स; योग्यवेळी माहिती देऊ : मुख्यमंत्री
      मुंबई : भोंदूबाबा अशोक खरात याच्यासोबतची ओळख रूपाली चाकणकर यांना चांगलीच भोवली आहे. याबाबत एका प्रश्‍नाचे उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, अशोक खरात प्रकरणात रूपाली चाकणकर यांना देण्यात आलेल्या समन्सबाबत माझ्याकडे माहिती नाही. जी काही चौकशी सुरू आहे, ती निष्पक्षपणे सुरू आहे. दररोज अशा प्रकरणांची माहिती दिली जात नाही. आवश्‍यकता असल्यासच आम्ही माहिती घेतो. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी सुरू असून, योग्यवेळी त्याबाबतची माहिती दिली जाईल.

रुपाली चाकणकरांची आज चौकशी होण्याची शक्यता
दरम्यान अशोक खरातच्या अघोरी कृत्यांचा आणि आर्थिक व्यवहारांचा तपास करणाऱ्या विशेष तपास पथकाने आता त्यांचा मोर्चा खरातशी संबंधित संस्थांकडे वळवला आहे. खरातच्या शिवनिका संस्थेचे सर्व व्यवहार आता एसआयटीच्या रडारवर आले आहे. त्याच्या चौकशीसाठी रुपाली चाकणकर यांनाही समन्स बजावल्याची माहिती सूत्रांकडून मिळालीये. त्यामुळे रुपाली चाकणकारांच्या पाठीमागे आता चौकशीचाही सासेमिरा लागण्याची शक्यता आहे. रुपाली चाकणकर यांच्यासह शिवनिका संस्थानच्या आजीमाजी ट्रस्टींना समन्स बजावण्यात आलं असून आज चौकशीची शक्यता वर्तवली जात आहे. 

अशोक खरातला 1 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी
स्वयंघोषित कॅप्टन भोंदूबाबा अशोक खरात याच्या पोलीस कोठडीत वाढ करण्याचा निर्णय घेतला. आता 1 एप्रिलपर्यंत खरात पोलिसांच्या ताब्यात राहणार आहे. महिलांवरील अत्याचार आणि आर्थिक फसवणुकीच्या या गंभीर प्रकरणात पोलीस तपासात अद्याप अनेक गोष्टी स्पष्ट व्हायच्या आहेत. तपासाची व्याप्ती मोठी असून नवनवीन पीडित महिला समोर येत असल्याने, या वाढीव कोठडीत अशोक खरातच्या गुन्हेगारी साम्राज्याचे आणखी कोणते धागेदोरे हाती लागतात? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.